एका आदर्श व संस्कारक्षम शाळेचे बीज १९४० साली शिवाजीपार्क येथे कै. ल. ह. जोशी यांनी पेरले. शाळेचे आद्य संस्थापक कै. ल. ह. जोशी यांनी नव बालोद्यान मराठी शाळा एक आदर्श शाळा म्हणून निर्माण केली.
शिक्षण क्षेत्रात कार्य करण्याची आवड असलेल्या, शिक्षणाची तळमळ व मुलांवरील प्रेम व सामाजिक बांधिलकी यामुळेच शाळा निर्माण करण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाले.
अशा या हरहुन्नरी शिक्षकाचे २ सप्टेंबर १९५५ रोजी दु:खद निधन झाले. परंतु त्यापूर्वी त्यांनी शाळेची धुरा साने गुरुजींचा धडपडणारा मुलगा, स्वातंत्र्यसेनानी दादर विभागात सामाजिक कार्य करणाऱ्या व मुलांना ज्ञान देण्यासाठी धडपडणाऱ्या श्री. प्रकाशभाई मोहाडीकर यांच्याकडे सोपवली.
अतिशय प्रतिकूल स्थितीत शाळेची जडण घडण होत असताना शाळेची धुरा श्री. प्रकाशभाईंच्या खांद्यावर आली. परंतु साने गुरुजींच्या विचारांनी संस्कारीत असलेल्या श्री. प्रकाशभाईंनी अतिशय कष्ट घेऊन नव बालोद्यान मराठी शाळेचा कायापालट केला. आपल्या आवडत्या गुरूंचे साने गुरुजी हे नाव शाळेला देऊन त्यांचे उपकार फेडले.
१९४० सालापासून साने गुरुजी विद्यालय हे दिमाखात उभे आहे.
आपल्या प्रकाशभाईंचे मोठे बंधू श्री. रामभाऊ मोहाडीकर यांचे ही मोलाचे योगदान, शाळेच्या निर्मितीसाठी आहे.
तसेच श्री. प्रकाशभाईंच्या पत्नी कै. उषाताई मोहाडीकर या प्रकाशभाईंच्या पाठी खंबीरपणे उभ्या राहिल्या तेव्हा या शाळेचे अाद्यस्वरूप आपणास पहावयास मिळते. संस्थेचे अध्यक्ष श्री. सुधीरभाऊ जोशी व विद्यमान शाळेचे कार्यवाह श्री. मोहन मोहाडीकर व विश्वस्त मंडळ शाळेची धुरा यशस्वीरित्या पुढे नेत आहेत.
कै. ल. ह. जोशी यांनी स्थापन केलेली नव बालोद्यान मराठी शाळा हे नाव आपल्या संस्थेचे नव बालोद्यान विश्वस्त मंडळ असे नामांकन करून श्री. जोशी सरांची आठवण सदैव जागविली आहे.