पूज्य साने गुरुजींच्या नावाने पावन झालेली, आणि विद्यार्थांच्या सर्वांगिण विकासासाठी सतत धडपडणारी, दादर विभागातील एक नामांकित संस्कारक्षम शाळा म्हणजे… साने गुरुजी विदयालय, दादर.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करीत, नव बालोद्यान विश्वस्त मंडळाच्या या विद्यालयाचे सर्व सुखसोयींनी युक्त अशा भव्य वास्तूत रुपांतर झाले आहे. आपली शाळा ही पूज्य साने गुरुजींना अभिप्रेत असलेली आदर्श शाळा असावी या उदात्त भावनेने प्रकाशभाई मोहाडीकर यांनी या शाळेला आकार देण्यासाठी सर्वस्व वेचले आहे.
सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांचा शारिरीक, मानसिक आणि बौद्धिक विकास घडविण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेली, विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करणारी आणि भारतीय संस्कृतिचे संस्कार बालमनावर रुजविण्यासाठी सतत प्रयत्न करणारी एक प्रयोगशील शाळा म्हणून साने गुरुजी विद्यालय ओळखले जाते.
अनेक यशाची शिखरे गाठणारे शाळेचे माजी विद्यार्थी, अनेक क्षेत्रात आज यशस्वीपणे नावलौकीक मिळवित आहे. आणि आपल्या या यशाचे श्रेय आपल्या साने गुरुजी विद्यालयाला कृतज्ञतेने देतात हे शाळेचे संचित आहे. ज्ञान, कला, क्रीडा या तिन्ही गोष्टींना समान महत्व देणारी ही शाळा, माध्यमिक शालांत परीक्षेत सातत्याने ९०, ९५, १०० टक्के निर्णय लावून आपला यशाचा ध्वज उंच उंच फडकवत आहे.
संस्थेचे विश्वस्त, मुख्याध्यापक शिक्षक, लिपिक, सेवक तसेच विद्यार्थी आणि पालक यांचा एकमेकांवर असलेला विश्वास आणि परस्परांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध या मुळेच विद्यालय नवनवीन यशाची शिखरे गाठीत आहे…
खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे !
या भावनेने वाटचाल करणारी ही शाळा काळाप्रमाणे स्वतःला अपडेट करीत आहे. भविष्यातही करीत राहील…
अशा या संस्थेशी आणि विद्यालयाशी आपलेही संबंध स्नेहमयी राहोत हीच सदिच्छा !